Gautami Patil: गौतमी पाटीलवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे उपचारादरम्यान निधन

Gautami Patil’s Father Died: महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज संध्याकाळी गौतमीचे वडील रविंद्र पाटील यांचे पुण्यातील चिंतामणी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. नुकतीच गौतमीने तिच्या वडिलांची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली होती. त्यांना धुळ्यातील रुग्णालयातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठीही हलवले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Gautami Patil’s Father Passed Away)

रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून सध्या त्यांच्यावर धुळे शहरातील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रसारमाध्यमांवर ही बातमी प्रसिद्ध होताच गौतमी पाटीलने याची दखल घेत आपल्या मावशीला या गोष्टीची कल्पना दिली. तसेच मावशीला सांगितले की, वडिलांची तब्येत कशी आहे याची तू विचारणा कर. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी माझ्याकडे पुण्याला घेऊन ये. असे सांगितल्यानंतर तिच्या मावशीने लागलीच धुळे गाठले. या ठिकाणी त्यांच्या मावशी आणि धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेल्या. यासंदर्भात स्वत: गौतमीने माहिती दिली होती.

शिवाय वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन. पुढील उपचार त्यांचे मी पुण्यालाच करीन, अशी ग्वाहीदेखील दिली होती.