पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीने घेतला लिंग बदलण्याचा निर्णय, ‘सुचेतना’ची बनली ‘सुचेतन’

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (buddadeb bhattacharya) यांची मुलगी सुचेतना भट्टाचार्य (suchetana bhattacharya) हिने स्वत:ला ट्रान्समॅन घोषित केले आहे. सुचेतना म्हणाली की ती लवकरच सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी (SRS) करणार आहे. रॉय यांच्या म्हणण्यानुसार, सेमिनारमध्ये सुचेतनाने स्वत:ला ट्रान्समॅन असल्याचे सांगितले आणि लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर तिला सुचेतन या नावाने ओळखले जाईल असेही सांगितले.

सुचेतना म्हणाली, ‘माँटेसरीच्या दिवसांपासून मी स्वतःला पुरुष म्हणून ओळखले होते. ही भावना कालांतराने विकसित होत गेली. आणि आता मला शारीरिकदृष्ट्याही पुरुष व्हायचे आहे. मानसिकदृष्ट्याही मी पुरुष आहे.”

याबद्दल सुचेतनाने पालकांशी चर्चा केली आहे का? असे विचारले असता तिने ठामपणे उत्तर दिले, “ओबोशॉय (नक्की). माझी वडिलोपार्जित ओळख ही काही मोठी गोष्ट नाही. मी 41 वर्षांचा आहे, त्यामुळे माझ्या आयुष्याचे निर्णय मी स्वतः घेईन. यासाठी मी कायदेशीर आणि वैद्यकीय कार्यवाही सुरू केली आहे.”

सुचेतना ही पर्यावरण शास्त्रज्ञ आहे. तसेच एक ट्रान्सजेंडर कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. 2015 पासून, ती कोलकाता रेनबो प्राइड फाउंडेशनच्या संचालक मंडळाची सदस्य आहे.