“दिग्दर्शक दारुच्या नशेत रूममध्ये आला आणि नंतर रात्रभर…”, स्वरा भास्करने सांगितला धक्कादायक अनुभव

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्न आणि प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. स्वरा भास्करने तीन महिन्यांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमदसोबत लग्न केले होते. तेव्हापासून चाहते अभिनेत्रीच्या गुड न्यूजची वाट पाहत होते. अखेर स्वराने बेबी बंपसोबतचे फोटो शेअर करत घोषणा केली आहे की ती आई होणार आहे.

एकीकडे अभिनेत्रीने आनंदाची बातमी दिली असताना दुसरीकडे आपल्याला आलेला धक्कादायक अनुभवही तिने शेअर केला आहे. एका दिग्दर्शकाने स्वराला पहिल्याच भेटीत शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली होती, असा खुलासा स्वराने केला आहे.

कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल सांगताना स्वरा म्हणाली की, एका दिग्दर्शकाने मला कामाच्या बदल्यात लैंगिक सुख मागितले होते. रात्रीच्या वेळी तो दिग्दर्शक दारूच्या नशेत माझ्या रूममध्ये आला होता. त्याला मला मिठीत घ्यायचे होते. भूमिकेसाठी त्याने माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली होती. मात्र मी दिग्दर्शकाला नकार दिला होता. यामुळे मला अनेक चित्रपटात संधी मिळाल्या नाहीत.

या घटनेबद्दल सविस्तरपणे सांगताना स्वरा पुढे म्हणाली, जेव्हा मी बॉलीवूड इंडस्ट्रीत नवीन होते, तेव्हा मला मेसेज आणि डिनरचं निमंत्रण पाठवत छळण्यात आलं होतं. संपूर्ण दिवसभर तो माझा पाठलाग करायचा आणि रात्री मला फोन करायचा. एका सीनवर चर्चा करण्यासाठी मला त्याच्या हॉटेलमधील रूमवर जाण्यास सांगितलं होतं. मी गेली तेव्हा तो मद्यपान करत होता. पहिल्याच रात्री त्याने मला प्रेम, संभोग आणि वन नाइटबद्दल बोलण्यास सुरुवात केली. तो दारूच्या नशेत माझ्या खोलीत आला मला मिठी मारण्यास सांगू लागला.

मी घाबरली होती. मी एकटी आणि तरुण होती. पॅकअपनंतर मी लाइट बंद करायचे आणि मेकअप काढून टाकायचे. जेणेकरुन मी झोपली आहे असं इतरांना वाटेल. शेवटी दिग्दर्शकाच्या या सवयींना कंटाळून मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसरकडे तक्रार केली होती आणि त्यांच्याकडे सुरक्षा रक्षकांची मागणी केली होती, असे शेवटी स्वरा म्हणाली.