कसब्यात नियोजन व प्रचारात भाजपची आघाडी; मायक्रोप्लानिंग ठरणार गेम चेंजर ?

पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान तर 02 मार्चला मतमोजणी होणार आहे. कसबा पेठ ही विधानसभेची जागा मागील कित्येक वर्षापासून भाजपच्या ताब्यात राहिली आहे. त्यामुळे ही जागा पुन्हा ताब्यात यावी, यासाठी भाजपच्या नेत्यांकडून आढावा बैठकांचा धडका सुरू करण्यात आला आहे.

काल मंत्री गिरीश महाजन, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात कोअर कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या निवडणुकीत विजय मिळावा, यासाठी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून प्रचाराची दिशा ठरवण्यात आली आहे. असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. या बैठकीला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनीती आखली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने निवडणूक प्रमुख म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. तर मुरलीधर मोहोळ यांची निवडणूक प्रभारी म्हणून तर निवडणुक सहप्रमुख पदाची जबाबदारी धीरज घाटे यांच्याकडे दिली आहे. त्याचबरोबर शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, त्याचबरोबर महायुतीचे अनेक पदाधिकारी या पोटनिवडणुकीसाठी झपाट्याने काम करतांना दिसत आहे.

दरम्यान, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपने हेमंत रासने यांची निवड केली आहे. हेमंत रासने यांना बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. शिवसंग्राम, पतित पावन संघटना, लोक जनशक्ती आदींना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत येत्या 02 मार्चला कोण बाजी मारणार ? त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.