कब्बडीपटू संदीप नांगलची मैदानावर गोळ्या घालून हत्या; व्हिडीओ पाहून सर्वजन हादरून गेले

जलंदर- अंतरराष्ट्रीय स्तरावरील कब्बडीपटू असणाऱ्या संदीप नांगल याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. पंजाबमधील जलंदर येथे सोमवारी सायंकाळी चार जणांनी संदीपवर गोळीबार केल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलीय. यानंतर आता आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगलच्या हत्येनंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची फेसबुक पोस्ट समोर आली आहे.

संदीपची हत्या आमच्या टोळीने केल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई टोळीने पोस्टच्या माध्यमातून केला आहे. मल्ल्यान खुर्द गावात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेदरम्यान 4 हल्लेखोरांनी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूवर गोळीबार केला, त्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.मल्ल्या खुर्द येथे क्लबचे सामने सुरू असल्याचे घटनास्थळी सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांनी सांगितले. या स्पर्धेतील सामना खेळण्यासाठी संदीप नांगलने संघ आणला होता आणि मैदानावर जाण्यापूर्वीच हल्लेखोरांनी संदीप नांगल यांच्यावर गोळीबार केला. त्यांना तातडीने नकोदर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

तर दुसरीकडे गँगस्टर भगवान जग्गुपुरियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, संदीप नांगल अंबियन आमचा भाऊ होता आणि कायम राहील. त्याचबरोबर जग्गुपुरिया यांनी सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या टाकणाऱ्या काही लोकांनाही सतर्क केले आहे.

दरम्यान, संदीप सिंह यांचा जन्म नांगल अंबिया जिल्हा जालंधर या गावात झाला. लहानपणापासूनच संदीपला कबड्डीची खूप आवड होती आणि त्याने वयाच्या १८ व्या वर्षापासून व्यावसायिक कबड्डी खेळायला सुरुवात केली.