शासनाकडून सोलापूर महापालिकेला उजनी पाईप लाईनसाठी २६७ कोटींचा निधी देणार – Ajit Pawar

Ajit Pawar: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला (Solapur Municipal Corporation) उजनी (Ujani Dam) येथून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा २६७ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातील सुमारे ९० कोटींचा पहिला हप्ता पुढील दोन दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

यावेळी आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले, शहर पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, एमजीपीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरणातून १७० दशलक्ष लिटर पाणी सोलापूर शहराला दररोज आणण्यासाठी ८९४ कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे. या अंतर्गत कामे सुरू आहेत. राज्य शासनाचा २६७ कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून, त्यातील पहिला टप्पा सुमारे ९० कोटी पुढील दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील. तरी महापालिकेने या अनुषंगाने पुढील कामे त्वरित पूर्ण करून सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

सोलापूर शहर महापालिकेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून जुना पुना नाका ते पत्रकार भवन व जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला असे दोन उड्डाणपूल मंजूर असून भूसंपादनासाठी १०१ कोटींचा शासन हिस्साही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उजनी धरण पाणीपातळी कमी झाल्याने शहरातील लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दुबार व तिबार पंपिंग महापालिकेला करावे लागते, त्यासाठी आवश्यक असलेला ३.५४ कोटीचा तर हुतात्मा स्मृती मंदिराच्या नूतनीकरणासाठी ३.३६ कोटीचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाईसदृश्य परिस्थिती आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत ज्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू आहेत त्यातून प्रत्येक गावात पाणीपुरवठा झाला पाहिजे यासाठी सांगोला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चांगल्या प्रकारे चालवली जात आहे, तरी याच धरतीवर जिल्ह्यातील सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना संबंधित यंत्रणांनी चालवल्या पाहिजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक गावात आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठा उपाययोजना कराव्यात. तसेच जनावरांना माहे जून २०२४ अखेरपर्यंत चारा उपलब्ध होईल यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश देतानाच बियाणे महामंडळाने टंचाई परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याला चारा बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असेही निर्देशित केले.

महत्वाच्या बातम्या-

Vijay Thalapathy | सुपरस्टार विजय थलपतीची राजकारणात एन्ट्री, पक्षाचीही केली घोषणा; पाहा लोकसभा लढवणार का?

Supriya Sule | …म्हणून देवेंद्र फडणवीसांची तक्रार सुप्रिया सुळे आता थेट अमित शाह यांच्याकडे करणार

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महेश गायकवाड यांची भेट, रुग्णालयात जाऊन प्रकृतीची केली विचारपूस