‘फडणवीसांचा राज्यपालांना पाठिंबा? शिवाजी महाराजांचा अपमान केल्यावर साधा निषेध सुद्धा नाही’

औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराज हे तर महाराष्ट्राचे जुने आदर्श असून नितीन गडकरी सध्याचे आदर्श आहेत, असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल  कोश्यारी बोलत होते.

त्यांच्या या विधानावर विविध राजकीय पक्षाचे नेते संताप व्यक्त करत आहेत. मात्र अद्याप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची याप्रकरणी कसलीही प्रतिक्रिया आलेली नाही. अर्थात फडणवीस यांचे राज्यपालांना समर्थन आहे का, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी उपस्थित केला आहे.

‘सावरकरसाठी ट्विट करत पत्रकार परिषेद घेणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यावर साधा निषेध सुद्धा करत नाहीत याचा अर्थ त्यांचा पाठिंबा आहे का?’, असा प्रश्न सूरज चव्हाण यांनी फडणवीसांना केला आहे. 

काय म्हणाले राज्यपाल?
‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.