‘भाजपकडे ११३ आमदार असूनही हिंदुत्वासाठी मुख्यमंत्रिपदाचा फडणवीसांनी त्याग केला’

मुंबई – भारतीय जनता पार्टीकडे (BJP) सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी (Hindutva) लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसेच नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी शुक्रवारी केले. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना त्यांनी प्रदेश भाजपातर्फे शुभेच्छा दिल्या.

ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष मा. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), प्रदेश उपाध्यक्ष आ. राम शिंदे, माधव भांडारी, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, कृपाशंकरसिंह, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आ. बबनराव लोणीकर, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुनील कांबळे व आ. नारायण कुचे उपस्थित होते.यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार राज्याची विकासकामे गतीने पूर्ण करेल आणि सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटेल असे काम करेल.

पाटील म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या आमदारांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले. त्यानंतर भाजपाने पर्यायी सरकार देण्यासाठी पुढाकार घेतला. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आणि ध्यास आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी लढणारे शिवसैनिक तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीकडे ११३ आमदार असूनही हिंदुत्वासाठी मुख्यमंत्रिपद सोडताना देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखविला व त्याग केला. त्यांच्या त्यागाचा भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान आहे.

ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या आधारावर स्थापन झालेल्या भाजपा – शिवसेना युतीला जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत दिले. परंतु, शिवसेनेच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाला सोडून अल्पसंख्यांकांचा अनुनय करणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केली. त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत हिंदुत्व संकटात आले आणि विकासकामे ठप्प झाली. अशा स्थितीत अंतर्गत कलहामुळे आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाने पर्याय देण्यासाठी पुढाकार घेतला.