आमदार राहुल कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्याला पहिले मंत्रीपद मिळणार का ?

दौंड/ सचिन आव्हाड – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे.एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे . या सरकार मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी दौंड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुल कुल (MLA Rahul Kul)  यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाढली आहे . आमदार राहुल कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्याला पहिले मंत्रिपद मिळण्याची आशा दौंड तालुक्यातील जनतेला आहे .

आमदार राहुल कुल यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वतःच्या खांद्यावरून न घेता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपवली आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नसले तरी त्यांच्या निकटवर्तीय आमदारांना चांगल्या खात्याची जबाबदारी ते देणार आहेत अशी चर्चा आहे. यामुळे कुल यांच्या रूपाने दौंड तालुक्याला पहिला लाल दिवा मिळू शकतो अशी आशा दौंड तालुक्यातील जनता व्यक्त करीत आहे.

सन 1990 मध्ये स्व. आमदार सुभाष अण्णा कुल हे प्रथम अपक्ष निवडुन आल्यानंतर त्यांनी कोणतीही अट न घालता इतर अपक्ष आमदारांचा पाठिंबा सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी ला दिला.मात्र त्यावेळी मंत्रीपदाने तालुक्याला हुलकावणी दिली.तेव्हापासून आज तागायत तालुक्याला मंत्रीपद मिळाले नाही हे दुर्दैव आहे.

2014 च्या निवडणुकीत मंत्रिपदाने दिली हुलकावणी :

आमदार राहुल कुल हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे व महायुतीचे उमेदवार म्हणून दौंड तालुक्यातून निवडून आले होते. यावेळी देखील महायुतीचा सहयोगी पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाला (RSP) मंत्रीपद देण्यात आले. मात्र राज्याचे माजी पशु दुग्ध मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मनाचा मोठेपणा न दाखवता कुल यांच्या ऐवजी स्वतः कॅबिनेट मंत्रीपद घेतले. 2014 च्या निवडणुकीत जानकारांनी दौंड लाल दिवा देऊ अशी घोषणा केली. मात्र दिलेला शब्द जानकरांनी पाळला नसल्यामुळे लाल दिव्याने पुन्हा दौंड तालुक्याला हुलकावणी दिली.

2019 साली सरकार विरोधी पक्षांचे बनल्याने संधी हुकली :

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवत सलग दुसऱ्यांदा ते विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. यावेळी देखील कुल यांना मंत्रीपद देऊ असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. परंतु ऐनवेळी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. त्यामुळे दौंडकरांच्या पदरी पुन्हा निराशा पडली.

सुमारे अडीच वर्षाच्या कालखंडानंतर शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळले असून भाजपाच्या सहकार्याने एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री ठरले आहेत.नव्याने होत असलेल्या मंत्रिमंडळामध्ये पक्षातील वरिष्ठ्यांच्या आदेशाने देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले असले तरी त्यांच्या निकटवर्ती आमदारांना चांगल्या मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.

आमदार कुल यांना मंत्रिपद

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार आहेत. आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून चांगली लढत दिली. त्यांचे कौतुक भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी देखील केले होते.एकंदरीत आमदार राहुल कुल यांची अभ्यासुवृत्ती व पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांना थोपवण्याची धमक असल्यामुळे आमदार राहुल कुल यांना राज्याच्या मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळू शकते असे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.