मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा, पुढे काय करायचं ते ठरलंय! – संभाजीराजे

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा राज्यसभेसाठी शिवबंधन (shivbandhan ) हाती बांधण्यास नकार असल्याचे समजते. त्यामुळे आता शिवसेनेकडून उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. सुरूवातीला ज्येष्ठ नेत्यांना या जागेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण आता कोल्हापूरातीलच संजय पवार(sanjay Pawar)  हे नाव अचानक चर्चेत आलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाली आहे. पुढे काय करायचं, ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर नेमकं या दोघांमध्ये काय ठरलंय, यावर चर्चा सुरू झाली आहे.

राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.