होय, माझे शरद पवारांशी संबंध आहेत; भांडाफोड झाल्यानंतर आता बृजभूषण सिंह यांनीच दिली कबुली

लखनौ  – अयोध्या (Ayodhya) दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत केला. ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला होता. आता मनसे नेत्यांकडून एक फोटो शेअर करण्यात या फोटोच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे बोट दाखवण्यात आले आहे.

या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) आणि शरद पवार (Sharad Pawar) -सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकत्र पाहायला मिळतायत. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी काही फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत . राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरुय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, आता या सर्व घडामोडींवर खुद्द बृजभूषण सिंह यांनी त्यावर खुलासा केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. महाराष्ट्र कुस्ती संघासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. आम्ही कुस्तीसाठी जे काम केलं, त्यासंदर्भात ते माझं कौतुक करत होते. तीन दिवसांपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा शरद पवारांसाठी येत होत्या, त्या मला घातल्या याचा मला गर्व आहे. माझे संबंध आहेत त्यांच्याशी, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. आजही शरद पवार आम्हाला भेटले, तर मी त्यांच्याशी नजर चुकवणार नाही. मी त्यांना नमस्कार करेन. ते माझ्यासाठी एक चांगले नेते आहेत. त्यांच्याकडून राज ठाकरेंनी काहीतरी शिकायला हवं असं ते म्हणाले.