भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला, राष्ट्रवादीवर केलेला आरोप बिनबुडाचा – तपासे

मुंबई – अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत केला. ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. आता मनसे नेत्यांकडून एक फोटो शेअर करण्यात या फोटोच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे बोट दाखवण्यात आले आहे.

या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार (Sharad Pawar) -सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकत्र पाहायला मिळतायत. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी काही फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत . राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरुय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे. मनसेने पवारसाहेबांचा २०१८ चा फोटो व्हायरल करुन जो संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा राजकारणाशी काहीही संबध नाही.असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

पवारसाहेब राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि ब्रिजभूषण हेही भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला आहे. मनसेकडून केलेला आरोप हा बिनबुडाचा व चुकीचा आहे. मनसेला राजकारणात महत्त्व उरलेले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर ते बोलत आहेत असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे(NCP spokesperson Mahesh Tapase)  यांनी लगावला.