मराठी सिनेमाचा गौरव हरपला ! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव अजिंक्य देव यांनी याबाबत माहिती दिली आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी ९३ व्या वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटात काम केले होते.

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

राजश्री प्रोडक्शनच्या १९६२ साली आलेल्या आरती या सिनेमातून त्यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. रमेश देव यांनी आजपर्यंत जवळपास १८० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेते श्री रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीचा गौरव हरपला आहे. मराठी सिनेमासृष्टीची फार मोठी हानी त्यांच्या निधनाने झाली आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

सुमारे तीन पिढ्यांनी रमेश देव यांच्या अभिनयाचा आस्वाद घेतला. मराठी आणि हिंदी मिळून 500 चित्रपट त्यांनी साकारले. टीव्ही मालिका, जाहिरात विश्व सुद्धा त्यांनी गाजवले. नाटकांमधून त्यांनी मराठी नाट्य विश्व समृद्ध केले, त्यासाठी अमूल्य योगदान दिले. रमेश देव यांची अनेकदा भेट होत असे. प्रत्येक वेळी त्यांच्यातील तरुण अभिनेता डोळ्यासमोर येई. जितके चांगले कलावंत, तितकेच चांगले व्यक्तिमत्त्व सुद्धा ते होते. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीने एक मोठा आधारस्तंभ गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.