केंद्रसरकारच्या विरोधातील असंतोष लपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर –  राष्ट्रवादी 

मुंबई –  मनी लाँड्रिंगसह अनेक गंभीर आरोप असणाऱ्या महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक(nawab malik)  यांना ईडीने आणखी एक मोठा दणका दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने(ED)  त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. मलिकांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे.

ईडी कडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्स, कुर्ल्यातील गोवावाला कम्पाउंड येथील व्यावसायिक जागा, वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील १४८ एकर जमिनीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.तसेच, ईडी कडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता या नवाब मलिक यांच्या स्वत:च्या नावावर तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या शिवाय या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, या कारवाई नंतर आता  केंद्रसरकार विरोधात वाढलेल्या असंतोषावरुन लक्ष विचलित करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे(mahesh tapase)  यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता मंत्री नवाब मलिक यांची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली आहे. ईडीचा धाक दाखवून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा भाजपचा हा अजून एक प्रयत्न असून पेट्रोल – डिझेल दरवाढ, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर भाजप गप्प का आहे असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.