‘किरीटजी… स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही’

मुंबई   – आरोप करणं सोपं असतं आणि मग स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही असा जोरदार टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांना लगावला. आज जनता दरबारात आले असता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip valase Patil) यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.

किरीट सोमय्या (Kirit Somayya) सध्या नॉटरिचेबल आहेत याबाबत पत्रकारांनी विचारले असता तुमचे झेड सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत असे केंद्राला विचारू असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

सदावर्ते प्रकरणाविषयी रितसर चौकशी सुरू आहे. जी माहिती पोलिसांना मिळत आहे ती माहिती न्यायालयात देत आहेत त्यामुळे चौकशीचा भाग काय आहे आणि नाही यापेक्षा हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना उघड करणं योग्य नाही असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

सिल्व्हर ओक हल्ल्याबाबत ४ एप्रिलला गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळवलं होतं तरीसुद्धा दुर्लक्ष झाले. जास्तीचा बंदोबस्त ठेवायला हवा होता तेवढा ठेवला गेला नाही त्यामुळे संबंधित डीसीपीची (DCP ) बदली करण्यात आली आहे तर गावदेवी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाला निलंबित केलेले आहे. अधिक चौकशी सुरू आहे. चौकशीत जे जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई करु असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.