दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचला होता, सहकाऱ्याचा अभिनेत्रीवर खळबळजनक आरोप

Mumbai- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे, MNS) पक्षाचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हत्येचा कट दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी रचला होता, असा गंभीर आरोप अहमदनगर- सामाजिक कार्यकर्ता भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांनी केला आहे. तसेच दिपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याशी संबंध असल्याचेही भाऊसाहेब शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. त्यांच्या या खुलास्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब शिंदे हे दिपाली सय्यद यांच्याबाबत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली होती. दिपाली सय्यद यांच्या दुबई आणि पाकिस्तान कनेक्शनबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता.

यानंतर आता भाऊसाहेब शिंदे यांनी दिपाली सय्यद यांच्याकडे येणारा पैसा दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या हत्येचा कटही दिपाली सय्यद यांनी रचला होता, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. न्यूज १८ मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

भाऊसाहेब शिंदे हे दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक आहेत. दोन आठवड्यापूर्वीच त्यांनी दीपाली सय्यद यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.