राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधीच पोस्टरवरील उल्लेखाची चर्चा; हनुमान जन्मोत्सवाला तापणार वातावरण

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ठाण्यातील सभेत त्यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यातच आता राज ठाकरे उद्या हनुमान जन्मोत्सव पुण्यात साजरा करणार आहेत.

पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असल्याचं पोस्टर लागलं असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे. ही महाआरती म्हणजे राज ठाकरेंच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे.

पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता ही आरती होणार आहे. गेली दीड शतक खालकर मारुती मंदिर हे भविकांचे श्रद्धास्थान राहिले आहे. हे मंदिर जुने झाल्या मुळे आणि एका अपघातात मंदिराची भिंत पडल्या मुळे २० वर्षा पूर्वी मंदिराच्या बांधकामाची सुरवात राजठाकरे यांच्या हस्ते झाली होती. यामुळे उद्या होणाऱ्या या आरतीला भाविकांनी उपस्थित रहावे असं आवाहन मनसेने केले आहे.