दिशा सालियान प्रकरणातही आलं सचिन वाझेचं नाव, नितेश राणेंनी सांगितला संबंध

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान (Disha Salian) यांच्या मृत्यू प्रकरणावरुन  सध्या बराच मोठा गोंधळ सुरु आहे. राणे कुटुंबीयांनी दिशा सालियानच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेनेला लक्ष्य करण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे.  त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी  दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “दिशाला ८ जूनच्या रात्री ब्लॅक रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? याशिवाय वाझेला पोलीस दलात ९ जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आले होते. काही कनेक्शन?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

मालवणी पोलिसांनी योग्य तपास न केल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. बरोबर ना? आणि आता याच पोलिसांना महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे? हे किती योग्य आहे? नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहेत? मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झाले नसल्याचे दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. चला किमान ते आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे, असेही राणे यांनी पुढे म्हटले आहे.

मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि त्या दिवशी रात्री उपस्थित असणारा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही?, असा सवाल देखील राणे यांनी विचारला आहे.