राज्यपाल कोश्यारी असेपर्यंत काकडेंना विधानपरिषद देऊ नका! बापटांची शरद पवार यांना विनंती

पुणे – राज्यपालांकडे रखडलेल्या बारा जणांच्या नावाच्या यादीचा राजकीय मुद्दा गेले वर्षभर गाजत आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना विनंती करून पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे (Ankush Kakade) यांना काहीही द्या, पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) असेपर्यंत विधान परिषद देऊ नका’ असे जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे.

पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांच्या ‘हॅशटॅग पुणे’ (Hashtag Pune) या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात झाले. यावेळी खासदार गिरीश बापट, श्रीनिवास पाटील (Srinivas Patil), वंदना चव्हाण (Vandana Chavan), उल्हास पवार, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, उत्कर्ष प्रकाशनचे सु.वा.जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या खुमासदार कार्यक्रमात खासदार बापट यांनी थेट शरद पवार यांनाच विनंती करून अंकुश काकडे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका, असे जाहीरपणे सांगितल्याने सभागृहात हशा पिकला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले, एक गंमती जमतीचा, आठवणीचा असा हा आजचा सोहळा आहे. गिरीश बापट, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला (Shantilal Suratwala) यांची मैत्री महापालिकेत प्रसिध्द आहे. अनेक वेळा अनेक जागा पुण्यात आम्ही जिंकल्या. पण मला अजून लक्षात आलं नाही, गिरीश बापट कोठेही उभे राहतात अन निवडून येतात. एकदा बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही. आता हे पुस्तक पाहिल्यावर लक्षात आलं की यांची मैत्री आहे की आणखी काही आहे.