राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार?; शिवसेना आक्रमक

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. तरीही नवनीत राणा यांनी रविवारी (8 मे) लिलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्जार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Shiv Sena leader Manisha Kayande) यांनी नवनीत राणा यांनी न्यायालयाच्या अटीचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

माध्यमांशी बोलल्याने राणा दाम्पत्याने न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केलं आहे, असं सरकारी वकील प्रदीप घरत (Public Prosecutor Pradeep Gharat) यांनीही म्हटलंय. यासंदर्भात आपण न्यायालयात जाणार असून राणांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत असंही प्रदीप घरत यांनी स्पष्ट केलं.

नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीला उभे राहू असंही त्या म्हणाल्या. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.