डाॅ. भागवत कराड यांनी परळी मतदारसंघात अचानक घेतलेल्या भेटीगाठीने तर्कवितर्कांना उधाण!

'वैद्यनाथ'च्या जीएसटी कारवाईवर मात्र कराडांचं मौन

Bhagwat Karad: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी अचानक परळीत (Parli) येऊन वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विरोधात काही राजकीय खेळी तर सुरू नाही ना? अशी चर्चा दबक्या आवाजात सध्या सुरू आहे. दरम्यान, वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईवर मात्र अर्थ राज्यमंत्र्यांनी मौन बाळगल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर वस्तू आणि सेवा कर (GST) विभागाने जप्तीची नोटीस लावत काही दिवसांपूर्वी कार्यवाही केली. यामुळे मुंडे समर्थकात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील भाजपा व गैर भाजपा नेत्यांच्या कारखान्यांना राज्य व केंद्र सरकार आर्थिक मदत करत आहे मात्र स्व. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या व सध्या पंकजा मुंडे चालवत असलेल्या वैद्यनाथ कारखान्याला मात्र मदत तर नाहीच उलट कारखान्यावर जीएसटी विभागाकडून सूडबुद्धीने जप्तीची कार्यवाही केल्याची धारणा मुंडे समर्थकात निर्माण झाली आहे. याविरुद्ध सोशल मीडियात राज्य व केंद्रीय भाजपा नेत्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटीची 19 कोटींची थकबाकी लावण्यात आली, त्यानंतर ऊसतोड मजूर व पंकजा मुंडे समर्थकांनी ही थकबाकीची रक्कम लोक वर्गणीतून जमा करून सरकारच्या तोंडावर मारण्याची उघड मोहीम सध्या राबवली आहे. या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मुंडे समर्थकांच्या म्हणण्यानुसार दोनच दिवसात 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त चेक जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अर्थ राज्यमंत्र्यांचा दौरा कशासाठी?
या सर्व घडामोडींवर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डाॅ. भागवत कराड यांनी कुठलाही गाजावाजा न करता अचानक परळी मतदारसंघात दौरा केला. या दौऱ्याबाबत प्रसिद्धी माध्यमांनाही कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. या दौऱ्यात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी वैद्यनाथ कारखान्याचे संचालक शिवाजी गुट्टे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने तर अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजपाने महाराष्ट्रात ओबीसी जागर यात्रा सुरू केली आहे. मात्र या दौऱ्यापासून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे यांना दूर ठेवले आहे. नुकत्याच बीड येथे ओबीसी साठी मोर्चा काढणारे प्रा. टी पी. मुंडे यांची सुद्धा अर्थ राज्य मंत्री कराड यांनी भेट घेतली. तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक माजी आमदार संजय दौंड यांची सुद्धा भेट घेतली, यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.डाॅ. भागवत कराड हे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच आपण इथपर्यंत पोचल्याचे सांगत असतात मात्र त्यांनी परळीत येऊनही गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय भागवत कराड यांच्याच खात्यांतर्गत असलेल्या वस्तू आणि सेवा कर (GST) विभागाने वैद्यनाथ कारखान्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत प्रचंड नाराजी असताना परळी तालुक्यात त्यांच्या एकप्रकारे गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय? याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

https://youtu.be/j_RAemrZOnM?si=AzEv6lHWz-E94ZLF

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादी काँग्रेसने लोकशाहीची तत्त्वे आणि जनतेची इच्छा सातत्याने जोपासली आहे – राष्ट्रवादी

निवडणूक आयोगाचा पेपर फुटलेला नाही तर हा पेपर स्वच्छ समोर आहे – Sunil Tatkare

राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी व समस्या राज्यपालांनी सोडवाव्यात :- Nana Patole