चांदणी चौकामुळे नागपूरकर आणि पुणेकरांच्या पाहुणचाराचा संगम झाला – डॉ. नीलम गोऱ्हे

स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृह जलद गतीने उभारल्यास नागरिक आणि महिलांचा प्रवास अधिक सुखाने होईल.

पुणे  : नागपूरकर आणि पुणेकर यांच्या पाहुणचाराची सारखी चर्चा होत असते त्याबद्दल सातत्याने बातम्या देखील येत असतात. आज चांदणी चौकामुळे नागपूरकर आणि पुण्याकरांच्या पाहुणचाराचा संगम झाला असल्याची भावना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe ) यांनी व्यक्त केली.

आज पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बावधन भागातील चांदणी चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे उदघाटन केंद्रिय भूपृष्ठ मंत्री मा. ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, रस्ते बांधणीच्या वेगाप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृह उभारावीत जेणेकरून नागरिक आणि महिला अधिक सुखाने प्रवास करतील असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

दुर्गम भागात, आपत्कालीन परिस्थितीत, विकासाचा मार्ग, आरोग्यदायी सेवा पुरवण्यासाठी, पाणी पोहोचवण्यासाठी या प्रत्येकासाठी रस्त्यांच योगदान असतं. चांगल्या दर्जाच्या रस्त्यांमुळे भारताचा चेहरा-मोहरा बदलत असून आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे जात असल्याची जाणीव होत आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये रस्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

आपण सर्वांनी मिळून या भागातील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी जे प्रयत्न केले त्याला आज फळ मिळाले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. हा प्रकल्प तत्परतेने पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान  नरेंद्र मोदी, केंद्रिय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री महोदय  चंद्रकांत पाटील आणि राज्य – केंद्र सरकारचे सर्व अधिकारी वर्ग यांचं डॉ. गोऱ्हे यांनी अभिनंदन केले. आम्ही फक्त रस्ते बांधत नसून देशाची बांधणी करत आहोत अशा प्रकारची भूमिका सरकारने घेतली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. निसर्गाचा आणि तंत्रज्ञानाचा नियम आहे. नवीन काही उभारण्यासाठी आधीचं मोडकळीस आलेलं आपल्याला तोडून टाकाव लागत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि श्री. नितीन गडकरी यांचा चांगला स्नेह होता. कुठेही रस्त्याची अडचण आली की गडकरी यांना बोलावून घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच विधान परिषदेला १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ऑक्टोबर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यासंदर्भात कार्यक्रम घेणार आहोत. यामध्ये उपस्थित मान्यवरांनी सहभागी व्हावे याकरिता डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना आमंत्रित केले.