तानाजी सावंत यांच्या महत्वपूर्ण भूमिकेमुळे आदिनाथ साखर कारखान्याचा प्रश्न मार्गी लागणार ?

करमाळा – आदिनाथ कारखाना अडीचणीत असल्याचे दाखवून 25 वर्षे भाडे कराराने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आमदार रोहित पवार यांना करमाळा तालुक्यातील सर्व थरातून विरोध होत होता. मात्र कायदेशीर बाबीत आमदार पवार सर्वांवर मात करत असल्यामुळे तालुका वासियांची यांची निराशा झाली होती .राज्यात सत्ता बदल होताच मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी पुढाकार घेऊन आदिनाथ सहकार तत्वावर सभासदांच्या मालकीचा रहावा यासाठी पूर्णपणे ताकद पणाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी प्रयत्न केला आहे

यापूर्वी प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी कारखाना लिलाव प्रक्रियेतून बाहेर येण्यासाठी एक कोटी रुपयांची रक्कम कारखान्यात भरली होती. आजही उद्या होणाऱ्या डीआरटी कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या अटीप्रमाणे जवळपास चार कोटी रुपयांची रक्कम जयवंत मल्टीस्टेट च्या माध्यमातून भरून आदिनाथ सहकारी तत्त्वावर राहण्याचा मार्ग मोकळा केला असल्याची चर्चा आहे.

बारामती ॲग्रो तीन वर्षांपूर्वी आदिनाथ कारखाना चालविण्यासाठी कराराने घेतला होता मात्र तीन वर्षात त्यांना कारखाना सुरू करता आला नाही. बारामती ॲग्रो ने वेळेत कारखाना सुरू न केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षी ऊस पेटवून द्यावा लागला. यामुळे रोहित पवाराबद्दल ऊस उत्पादकात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली होती.

कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल कोलते पूर्वीच्या काळात रोहित पवार यांना कारखाना देण्यास तयार होत्या पण वेळेत कारखाना सुरू न केल्यामुळे रोहित पवारांबद्दल बागल गटात ही प्रचंड नाराजी झाली. यामुळे बागल गटांनी बचाव समिती च्या माध्यमातून बारामती ऍग्रो ला भाडे करारांनी कारखाना देण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन रद्द केला व न्यायालयीन लढाई सुरू झाली.

आदिनाथ कारखाना ताब्यात आला तर आपण तालुक्याचे राजकारण करू आमदार होऊ या भावनेतून आदिनाथ चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला होता. सत्ता बदल झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपण आदिनाथ च्या माध्यमातून राजकारण करणार नसून हा कारखाना मला चालवायला द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. मात्र यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करमाळा तालुक्यातील विकासासाठी हा कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहिला पाहिजे ही भूमिका मांडून संचालक मंडळाला सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.

सत्ता बदल झाल्यानंतर माजी आमदार नारायण पाटील यांनी आपली पवार प्रेमाची पूर्वीची भूमिका बदलून हा कारखाना सहकार तत्त्वावर चालला पाहिजे यासाठी जाहीरपणे भूमिका मांडली व प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. यानंतर पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्राध्यापक सावंत यांच्यात चर्चा होऊन हा कारखाना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवण्याबाबत निर्णय झाला व त्यानंतर सूत्र फिरली. उद्या डीआरटी कोर्टात आदिनाथ संदर्भात सुनावणी असून उद्याच्या निकालाकडे सर्व तालुक्यातील लक्ष लागून राहिले आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची प्रतिक्रिया

कॅबिनेट मंत्री तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने आदिनाथ चा प्रश्न मार्गी लागत असल्याने संपूर्ण तालुक्यातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे .आता इथून पुढील काळात तालुक्यातील राहिलेले उर्वरित रखडलेले प्रश्न मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुटतील असा तालुक्यातील जनतेला विश्वास आहे.