संजय राऊतांशी युतीसंदर्भात चर्चा झाली…; मनसेच्या अभिजीत पानसेंनी सांगितले भेटीमागचे सत्य

मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांनी आज थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता अभिजीत पानसे यांनी या भेटीमागील खरे कारण सांगितले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी शिवसेना-भाजप युतीशी हात मिळवला आहे. या मोठ्या राजकीय नाट्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राज ठाकरे (Raj Thackeray) या बंधूंनी एकत्र यावे, अशी साद मनसे आणि शिवसैनिकांनी घातली आहे. ही चर्चा सुरू असतानाच अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांनी दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. त्यामुळे मनसेने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मात्र अभिजीत पानसे यांनी स्पष्टीकरण देत ही भेट युतीसाठी नव्हे तर वैयक्तिक कामासाठी झाल्याचे सांगितले. मुंबईत माध्यमांशी बोलताना अभिजीत पानसे म्हणाले, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी संजय राऊतांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात गेलो होतो. त्याचे वेगळे अर्थ लावू नका. या भेटीत राजकीय चर्चांचा काहीही संबंध नाही. माझे संजय राऊतांशी फार जुने संबंध आहेत. त्यामुळे मला त्यांना काही कामानिमित्त भेटायचं होतं, असे अभिजीत पानसे म्हणाले.