वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ दोन राज्यात पुन्हा मास्कची सक्ती करण्याची आली वेळ

लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये ( Uttar Pradesh) कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुखपट्टी (Mask) अनिवार्य करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्राजवळच्या गौतमबुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मीरत, बागपथ आणि बुलंदशहर (Bulandshahr) या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, दुसरीकडे हरियाणामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मुखपट्ट्यांचा वापर करणं बंधनकारक करण्याचा निर्णय हरियाणा सरकारनं घेतला आहे. हे नियम गुरुग्राम, फरीदाबाद, सोनीपत आणि झज्जर (Gurugram, Faridabad, Sonipat and Zajjar)  या जिल्ह्यांसाठी लागू असतील.राष्ट्रीय राजधानी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या या चार जिल्ह्यांमध्ये मुखपट्टी न वापरणाऱ्यांना दंड ठोठावला जाईल अशी माहिती हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज ( Hariyana’s Health Minister Anil Veej) यांनी दिली आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं (Covid preventive vaccination campaigns) 186 कोटी 70 लाख लस मात्रांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं (Ministry of Health and Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात लसीच्या 15 लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या. 12 ते 14 वर्षं वयोगटातल्या मुलांना आजवर 2 कोटी 46 लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. तर आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र नागरिकांना 2 कोटी 55 लाख वर्धक मात्रा आजवर देऊन झाल्या आहेत.