पाच राज्यातील दारूण पराभवानंतर आता होणार ‘या’ ठिकाणी कॉंग्रेसचे चिंतन शिबीर

नवी दिल्ली – पाच राज्यांत कॉंग्रेसचा ( Congress ) दारूण पराभव झाला आहे. यानंतर आता लवकरच राजस्थानमध्ये ( Rajasthan ) काँग्रेसचे चिंतन शिबिर होणार आहे. पुढील महिन्यात मे महिन्यात उदयपूर ( Udaypur ) येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात नेते आणि कार्यकर्त्यांकडून पराभवाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या चिंतन शिबिरात सुमारे 700 काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हे तीन दिवसीय चिंतन शिवार 14 ते 16 मे दरम्यान उदयपूर येथे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) आणि राहुल गांधी ( Rahul Gandhi )यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक गेहलोत ( Ashok Gehlot ) यांना संदेश पाठवला आहे.

यासोबतच काँग्रेस गुजरात, हिमाचल प्रदेश तसेच कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी पुढील वर्षी रणनीती आखणार आहे. या शिबिरात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे नऊ वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. 2013 साली जयपूर येथे झालेल्या या शिबिरात राहुल गांधी यांना पक्षाचे उपाध्यक्षही करण्यात आले होते. योगायोगाने तेव्हाही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतच होते.