शिवसेनेपाठोपाठ कॉंग्रेसमध्येही भूकंप; पाच आमदार नाॅट रिचेबल

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आल्याचं कळतं आहे. एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांच्या बंडाची डोकेदुखी सुरू असतानाचा दुसरीकडे काॅंग्रेसला धक्का बसला आहे. पक्षाचे पाच आमदार नाॅट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे.

विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. काल रात्रीपासूनच पक्षात त्यावरून धुसफूस सुरू होती. त्या वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाने ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना निरीक्षक म्हणून मुंबईत पाठवले आहे. त्यासाठीची बैठक पक्षाने बोलविली होती. त्यासाठी आमदारांना संपर्क करण्यात येत असताना पाच आमदार नाॅट रिचेबल असल्याचे लक्षात आले. त्यांची नावे लवकरच समजतील.