एकनाथ शिंदे यांच्या बंडावर चंद्रकांतदादांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, सरकार स्थापनेसाठी…

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena) महत्त्वाचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त आहे. शिंदे हे सध्या गुजरातमध्ये (Eknath Shinde in Gujarat) गेले आहेत. सध्या ते सुरतमधील ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात राजकीय भूकंप (Political earthquake) घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-Nationalist) बरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपबरोबर (BJP) गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, आम्ही राज्यात घडणाऱ्या घटनांच्या वळणांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. त्यामुळे काही बदल होतील असे म्हणणे थोडे घाईगडबडीचे आहे. आम्हाला एकनाथ शिंदे  यांच्याकडून काहीही निरोप आला नाही. त्यांनी जर आमच्यासमोर प्रस्ताव ठेवला तर आम्ही यावर नक्कीच विचार करून असे पाटील म्हणाले. याचबरोबर ही अडीच वर्षे सोडली तर मागची कित्येक वर्षे शिवसेना आमच्या सोबत होती आम्हाला शिवसेनेतील आमदारांच्या भावना माहित आहेत.

सध्या सुरु असलेल्या घडामोडींकडे आम्ही बारकाईने लक्ष देऊन आहोत आम्हाला सरकार स्थापन करण्यास मदत झाली तर आम्ही काही शांत बसणारे नाही आम्ही काही भजनी मंडळी नाही. सरकार स्थापनेसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार पण अजून आमची सावध भूमिका आहे. याचबरोबर आम्ही सध्या ताकही फुंकून पीत आहोत.