ईडीचं पुढचं टार्गेट धनंजय मुंडे, भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं !

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून धरणे आंदोलन करण्यात येत असून, सत्तेतील तीन पक्षांची एकजूट दाखवण्यात येत आहे.

त्यानंतर आता ईडीच्या रडारवर शिवसेना नेते संजय राऊत, अनिल परब आणि राष्ट्रवादीचे बडे नेते धनंजय मुंडे हे असल्याचं भाजप नेते आणि नाशिकचे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितलं आहे. आज दुपारी शहरात पक्षातर्फे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलीक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. भाजपा कार्यालय वसंतस्मृतीच्या बाहेर निदर्शने झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

बॉम्बस्पोटातील ओरीपींशी आर्थिक व्यवहार करून मलिक यांनी राष्ट्रविरोधी काम केले आहे. दुदैवाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष खोटे आरोप करून ईडी ला बदनाम करत आहे. मलिक यांच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहे. महाराष्ट्र सरकारने मलिक यांच्या बाबत आपली भुमिका स्पष्ट केली पाहिजे. हे सरकार आरोपीच्या पाठीशी आहे का? असा सवाल भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा आमदार प्रा.देवयानी फरांदे यांनी केला.