विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नका; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली – विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत व इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणी बाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना (Speaker of the Assembly) हे निर्देश दिले आहेत.

शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात केलेल्या याचिकांवरही आज सुनावणी होती. मात्र सरन्यायाधीश रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीचे नेमके काय होणार, याबाबत संदिग्धता आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांविरोधात शिवसेनेनं याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडे महाराष्ट्राच्या या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सरन्यायाधीशांसमोर महाराष्ट्राच्या प्रकरणाचा उल्लेख केला.

शिवसेनेच्या गटाच्या आमदारांना उद्या विधानसभा अध्यक्षासमोर उत्तर द्यायचे आहे, अशा स्थितीत या प्रकरणाची आज सुनावणी व्हायला हवी अशी मागणी सिब्बल यांनी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी घेण्यास नकार दिला. तसंच, शिवसेनेनं याचिका दाखल केलेल्या शिंदे गटाच्या 16 आमदारांवर कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहे.