‘…तर हेमंत रासने २५-२८ हजार मतांनी निवडून येतील’, संजय काकडे यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अवघे ४ दिवस उरले असून भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, आर.पी.आय. (आठवले गट), शिवसंग्राम, रा.स.प., रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे (Kasba Bypoll Election) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारार्थ मेहनत घेताना दिसत आहेत. अगदी नाराजीनंतर भाजपाचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) हेदेखील मैदानात उतरले आहेत.

काही दिवसांपूर्वी कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील सर्व नगरसेवक, माजी आमदार आणि खासदार, वरिष्ठ नेते यांची बैठक घेतली. या बैठकीत येत्या पोटनिवडणुकीसाठी रणनिती ठरवण्यात आली. तसेच केवळ कसबा विधानसभा पोटनिवडणूकीला लक्ष्य न करता येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने यंत्रणा राबवण्यात आली, अशी माहिती संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

तसेच स्व. मुक्ताताई टिळक यांच्यापेक्षा जास्त मतांच्या अंतरांनी हेमंत रासने निवडून येतील, असा विश्वासही संजय काकडेंनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, ही पोटनिवडणूक असल्याने मतदान ४०-४५ टक्क्यांच्या वर जाणार नाही असे मला वाटते. परंतु जर १ लाख २५ हजार मतदान झाले तर आम्ही राबवलेल्या यंत्रनेनंतर आम्ही २५-२८ हजार मतांनी निवडून येऊ. जर मतदान ३०-३५ टक्क्यांनी झाले तर आम्ही २२-२५ हजार मतांनी जिंकू. जर मतदान ५०-५५ टक्क्यांनी झाले तर मुक्ताताईंइतक्या ३५ हजार मतांनी आम्ही नक्कीच निवडून येऊ, असे प्रतिपादन यावेळी संजय काकडे यांनी केले आहे.