‘… म्हणून विरोधकांचा जळफळाट झाला आहे’; एकनाथ शिंदेंनी सांगतले नेमके कारण

मुंबई – लोकसभेत सरकारच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वासाच्या ठरावावर आज चर्चा सुरु राहणार आहे. काल ठरावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारची बाजू मांडली. तर इकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. कॉंग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे.

देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवलाय. २०१४ आणि २०१९ मध्ये सामान्य नागरिकांचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. २०२४ साली तो वृद्धिंगत होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.

भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत. ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही.असं शिंदे यांनी म्हटले आहे.