‘सगळ्यांनी अधिकाधिक दारू ढोसावी, बहुधा असंच या सरकारचं मत’, चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. दरम्यान ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतलाय. ‘सगळ्यांनी अधिकाधिक दारू ढोसावी, असं बहुधा या सरकारचं मत आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा दारू सहज उपलब्ध असेल. त्यामुळे रेशनदुकानापासून सगळीकडे दारू उपलब्ध करण्याचा निर्णय व्यसनमुक्तीसाठी आयुष्यभर झटणारे डॉ. अनिल अवचट गेले त्याच दिवशी मविआ सरकारने घेतला आहे. जागोजागी बिअर शॉपच्या तुफान यशस्वी आणि लोकप्रिय नाटकानंतर सादर आहे रेशन दुकान, सुपर मार्केटमध्ये (आणि म्हणाल तिथेही?) वाइनविक्री… मविआचं डोकं खरोखर फिरलंय? जागोजागी बिअर शॉप नव्हती, तेव्हा गरीबांचं काहीही अडलं नव्हतं. पण दुकानात रेशन नसेल, तर अडेल. वर तिथे वाइन हे जखमेवर मीठच!’ असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.