महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, देवेंद्र फडणवीस यांनी काढले ठाकरे सरकारचे वाभाडे

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. दरम्यान ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला चांगलंच फैलावर घेतलं आहे. ‘शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारुलाच! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारनं गरिबांना थोडी तरी मदत करावी. पेट्रोल-डिझेलऐवजी दारु स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढले.