‘राज्य बेवड्यांच्या ताब्यात दिल्यावर असंच होणार’, चित्रा वाघ आक्रमक

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. दरम्यान ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. ‘राज्यात आधी दारू स्वस्त केली नि आता किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी..तरुणाईला व्यसनाधिनतेची चटक लावू पाहणारा हा निर्णय सरकारनं बेधुंदावस्थेत घेतलाय की काय? हे मविआ म्हणजे ‘मद्य विक्री आवडी’ सरकार! राज्य बेवड्यांच्या ताब्यात दिल्यावर असंच होणार.. या निर्णयाचा कडाडून विरोध!’ असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.