आमदार फुटण्याची भीती; काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले

Karnataka Election Results : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election 2023) मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे असून भाजप खूपच मागे आहे. यानंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर पक्षाचा झेंडा फडकावला. त्याचवेळी बेंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेजमध्ये काँग्रेस समर्थक आनंदोत्सव साजरा करत आहेत. काँग्रेस समर्थकही एआयसीसी मुख्यालयाबाहेर जल्लोष करत आहेत.

कर्नाटकात काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली असून अशा स्थितीत पक्षाने आपले आमदार फुटू नये म्हणून तयारी केली आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे. यामध्ये सर्व विजयी आमदारांना ठेवण्यात येणार आहे.