कर्नाटकातील कॉंग्रेसच्या विजयाने संजय राऊतांचा आनंद गगनात मावेना; म्हणाले…. 

Karnataka Election Results : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या  ट्रेंडनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे असून भाजप खूपच मागे आहे. यानंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर पक्षाचा झेंडा फडकावला. त्याचवेळी बेंगळुरूमधील माउंट कार्मेल कॉलेजमध्ये काँग्रेस समर्थक आनंदोत्सव साजरा करत आहेत. काँग्रेस समर्थकही एआयसीसी मुख्यालयाबाहेर जल्लोष करत आहेत.

दरम्यान, या निकालाने ठाकरे गट सुखावला आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आनंद गगनात मावत नसल्याचे चित्र असून या निमित्ताने त्यांनी भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली.असं राऊत यांनी म्हटले आहे.