भारतीय फुटबॉलपटूंना डावलून रोनाल्डोचा पुतळा उभारणाऱ्या लोबोंना जनता शिकवणार धडा ?

पणजी : गोव्यात सध्या निवडणुकांचा माहोल असून या छोट्या राज्यामध्ये अनेक छोट्या-छोट्या मुद्यांचा नेत्यांना तसेच पक्षांना फटका बसत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. असाच एक मुद्दा सध्या चर्चेत येत आहे. हा मुद्दा गोव्यातील समुद्रकिनारी असलेल्या कलंगुटमध्ये प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पुतळ्याच्या बाबतचा असून यामुळे कॉंग्रेसनेते मायकल लोबो यांना फटका बसू शकेल अशी चर्चा आहे.

फुटबॉल विश्वातील अव्वल दर्जाचा खेळाडू असणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा एक भव्य पुतळा येथे उभारण्यात आला आहे. पण याच पुतळ्यामुळे स्थानिक तसेच गोव्यातील नागरिक मोठ्याप्रमाणावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी भारताच्या खेळाडूऐवजी पोर्तुगीज फुटबॉलपटूचा पुतळा उभारल्यामुळे यावरुन आक्षेप घेतला आहे.अर्जुन पुरस्कार विजेते आणि भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार ब्रुनो यांसारख्या स्थानिक फुटबॉल दिग्गजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

गोव्याच्या पणजी या मुख्य शहरात 400 किलोच्या (882-पाऊंड) पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काळे झेंडे घेऊन निदर्शक निषेध करण्यासाठी त्या जागेवर एकत्र आले होते. २८ डिसेंबर २०२१ रोजी या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या दिग्गज खेळाडूकडून तरुणांना प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश होता, पण देशप्रेमी जनतेने आणि आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली होती.

भारतीय फुटबॉलपटू सोडून परदेशी फुटबॉलपटूला सन्मानित करण्याच्या निर्णयावर संतप्त झाले होते तसंच गोव्यावर राज्य केलेल्या पोर्तुगिजांच्या देशातील खेळाडूची निवड हा एक लोबो यांनी ठरवून केलेला अपमान असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या पुतळ्याला विरोध असताना देखील लोबो यांनी आपले वजन वापरून हा पुतळा बसवला त्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. याचा फटका लोबो यांच्यासह त्यांच्या समर्थक उमेदवारांना देखील फटका बसू शकतो असं सांगितले जात आहे.