महाराष्ट्रभूषण सोहळ्यातील घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : नाना पटोले

लाखो लोक रखरखत्या उन्हात जमिनीवर आणि VIP लोक मात्र AC च्या गार सावलीत, हा कुठला न्याय?

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन होते. या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका कार्यक्रमाला आलेल्या श्रीसदस्यांना बसला व उष्माघाताने १२ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला व ५०० च्या वर रुग्णालयात उपचार घेत आहेत, ही घटना अत्यंत वेदनादायी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. हा कार्यक्रम सरकारचा होता त्यामुळे लोकांची व्यवस्था करणे ही सरकारची जबाबदारी होती पण ती केली गेली नाही. या घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

नवी मुंबईतील खारघरमधील घटनेत उष्माघात होऊन आजारी पडलेल्या लोकांची काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) जाऊन विचारपूस केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, २००८ मध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार मिळाला, त्यावेळी याच मैदानात यापेक्षा जास्त लोकं होती. आप्पासाहेबांना जानेवारी महिन्यात पुरस्कार जाहीर झाला त्याच वेळेस कार्यक्रम घेतला असता तर घटना टाळता आली असती, मात्र यांना मोठा नेता आणायचा होता. स्वतःसाठी वातानुकुलीत मंच तयार केला, त्यात मंत्रिमंडळ बसले होते व उन्हात जनता. भाजपाचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) सांगतात, आप्पासाहेब यांनीच सांगितले दुपारी कार्यक्रम करा… वास्तविक पाहता आप्पासाहेबांच्या भक्तांचा वापर करुन आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या लोकांनी करायचा आणि सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे बळी गेल्यावर आप्पासाहेबांवरच आरोप करण्यापर्यत यांची मजल गेली आहे.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी सरकारने १३ कोटी रुपये खर्च केले त्यांच्यासाठी मंच बांधता नाही आली, लोक खाली बसले होते, चादर नव्हती. ही सरकारने केलेली हत्या आहे, आता जनताच मागणी करत आहे की या सरकारवर सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. सरकारला जनाची नाही तर मनाची लाज असेल तर स्वतःहून राजीनामा दिला असता. आम्ही या घटनेवरून राजकारण करत नाही.

आप्पासाहेब धर्माधिकारी मानवतेची सेवा करतात म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘मनुष्य ही जात आहे आणि मानवता हा धर्म आहे’ असे आप्पासाहेब म्हणतात. पण राज्यातील सरकार श्रेय लाटण्यासाठी आहे, कोणाचा जीव गेला तरी त्याचे त्यांना काहीच नाही. आप्पासाहेबांवर प्रेम करणारे लाखो लोक कोकणातून या कार्यक्रमासाठी आले. सरकारने स्वतःला सावली व जनतेला उन्हात ठेवणे हे भयानक आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी झाली. जे मृत्यू झाले त्याचे आर्थिक मदत देऊन नुकसान भरून निघणार नाही. दिल्लीच्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी कितीदा करणार? असेही नाना पटोले म्हणाले.