जाणून घ्या क्रॉस व्होटिंग केल्यानं आमदारकी रद्द होऊ शकते का ?

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपमध्ये (BJP) सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होत असून या निमित्ताने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आपला विजय निश्चित व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून अपक्षांना तसेच छोट्या पक्षांना आपल्या बाजूनेवळविण्यासाठी दोन्ही बाजूने मोठ्याप्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. दरम्यान, या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग (Cross voting) होईल अशी देखील चर्चा असल्याने याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान, वृत्तवाहिनी ‘एबीपी माझा’नं निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाचे याबाबतचे संदर्भ तपासले असता, महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. जर एखाद्या आमदारानं आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं, तर त्याची आमदारकी रद्द होणार नाही, असं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीमध्ये लिहिलं आहे. पण यामुळे संबंधित आमदारावर पंक्षांतर्गत कारवाई होऊ शकते, असंही नमूद करण्यात आलं आहे.

विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आमदार अपात्र ठरत नाही, अशी माहिती निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या याआधीच्या निकालात समोर आली आहे. असं असलं तरी मतदानानंतर पक्षाच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवण्याचं आमदारांवर बंधन असतं. त्यावेळी क्रॉस व्होटिंग केल्याचा आक्षेप प्रतिनिधींनी घेतला तर निवडणूक अधिकारी ते मत बाद ठरवू शकतो, असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. अशा वेळी निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची ठरते, असं मत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून याआधी काम पाहिलेले विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे (Doctor Anant Kalse) यांनी व्यक्त केलं आहे.