राज्यसभा निवडणुक : छोटे पक्ष आणि अपक्ष ‘किंगमेकर’ ठरणार

मुंबई – राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA ) आणि भाजपमध्ये (BJP) सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होत असून या निमित्ताने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आपला विजय निश्चित व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून अपक्षांना तसेच छोट्या पक्षांना आपल्या बाजूनेवळविण्यासाठी दोन्ही बाजूने मोठ्याप्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. एरवी ज्यांची कधी चर्चा होत नाही असे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना राज्यसभा निवडणुकीमुळे अचानक महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे नेते आता या आमदारांना गळ घालत आहेत. आता हेच पक्ष कुणाचा विजय होणार हे ठरवणार आहेत.

दरम्यान, तीन आमदार असलेल्या हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची भूमिका अजूनही अस्पष्ट आहे. दोन आमदार असलेल्या समाजवादी पार्टीची तूर्त तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली आहे पण या दोन्ही बाजूची मते महाविकास आघाडीला मिळू शकतात. दोन आमदार असलेल्या एमआयएमची भूमिका गुलदस्त्यात आहे मात्र एमआयएम या निवडणुकीत तटस्थ राहिलं अशीच शक्यता आहे.

दोन आमदार असलेल्या बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची धान, हरभऱ्यासाठी अनुदानाची मागणी, त्यामुळे शेवटच्या क्षणी निर्णय घेण्याची बच्चू कडू यांची भूमिका आहे मात्र त्यांना सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करावे लागेल असं दिसतंय. अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) शिवसेनेसोबत जातील तर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांचा देखील कल महाविकास आघाडीकडेच दिसतोय. मनसेची आणि अन्य बहुसंख्य अपक्ष आमदारांची भूमिका गुलदस्त्यात आहे.