आधी भरमसाठ किंमती वाढवायच्या, नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा; मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात ८ रुपयांनी आणि डिझेलवर ६ रुपयांनी मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ₹ 8 आणि डिझेलवर प्रति लीटर ₹ 6 ने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर ₹ 9.5 प्रति लिटर आणि डिझेलचे दर ₹ 7 प्रति लिटरने कमी होतील. सरकारच्या महसुलावर या निर्णयामुळे वार्षिक सुमारे ₹ 1 लाख कोटींचा परिणाम होणार आहे.अशी माहिती केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे झालेली बिकट अवस्था, रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

या आधीही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी कर कमी केला होता, त्यावेळी भाजप शासित राज्यांनीही करामध्ये कपात केली होती. आता केंद्राने दुसऱ्यांदा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज्य सरकारं आता कोणती भूमिका घेणार, राज्यांतील कर कमी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये इतका वाढविला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी कर देखील 18 रुपये 24 पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही.आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.