लोकांना मूर्ख बनवू नका; इंधनाच्या किमती कमी करण्यावरून कॉंग्रेसची भाजपवर टीका

नवी दिल्ली – केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. त्याचबरोबर सरकारच्या या घोषणेनंतर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून सरकार जनतेला मूर्ख बनवत असल्याचा आरोप केला आहे. सुरजेवाला यांनी लिहिले की प्रिय अर्थमंत्री, आज पेट्रोलची किंमत ₹ 105.41 लीटर आहे. तुम्ही म्हणता की किंमत ₹ 9.50 ने कमी होईल. 21 मार्च 2022 रोजी म्हणजेच 60 दिवसांपूर्वी पेट्रोलची किंमत ₹ 95.41 लीटर होती. ६० दिवसांत, तुम्ही पेट्रोलची किंमत ₹10/लीटरने वाढवली आणि आता ती ₹9.50/लीटरने कमी केली. लोकांना मूर्ख बनवू नका.

सुरजेवाला यांनी पुढे लिहिले की, आज डिझेलची किंमत ₹ 96.67 लिटर आहे. तुम्ही म्हणता की आता किंमत ₹ 7 / लिटरने कमी होईल. 21 मार्च 2022 रोजी म्हणजेच 60 दिवसांपूर्वी डिझेलची किंमत 86.67 रुपये लिटर होती. ६० दिवसांत, तुम्ही डिझेलची किंमत ₹10/लीटरने वाढवली आणि आता ती ₹7/लीटरने कमी केली. लोकांना मूर्ख बनवणे थांबवा.