वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत कॉंग्रेसच्या माजी खासदाराचा राजीनामा

नवी दिल्ली – आसामचे माजी खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा (Former Assam MP and former state president Ripun Bora) यांनी वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.

बोरा यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, भाजपविरोधात (BJP) लढण्याऐवजी, आसाम काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा एक भाग भाजप सरकारसोबत मुख्यत: मुख्यमंत्र्यांसोबत गुप्त करार करत आहे. विशेष म्हणजे हे आरोप केल्यानंतर रिपून बोरा (Ripun Bora) यांनी खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee)  यांच्या उपस्थितीत टीएमसीमध्ये (TMC ) प्रवेश केला आहे. रिपुन बोरा यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले आहे की, मी विद्यार्थी जीवनापासून 1976 पासून काँग्रेसशी (Congress) संबंधित आहे. मी पक्षात विविध पदे भूषवली, पण आज जड अंत:करणाने मी पक्षाचा राजीनामा देत आहे.

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी तुमचे आणि काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानू इच्छितो. राजीनामा देताना मला सांगायचे आहे की, गेल्या काही वर्षांत भारतीय जनता पक्ष हा जातीय विभाजनाचे प्रतीक बनला आहे, तो लोकशाही (Democracy), संविधान (Constitution), धर्मनिरपेक्षता (Secularism), अर्थव्यवस्था (Economy)  आणि देशासाठी मोठा धोका आहे.

पक्षाच्या अंतर्गत लढ्याचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, भाजपविरोधात लढण्याऐवजी पक्षातील अनेक नेते आपापसात भांडण्यात गुंतले आहेत. त्यामुळे भाजपला फायदा होत आहे. यामुळे काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या सगळ्यात माझे गृहराज्यही त्याला अपवाद नाही. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तुम्ही माझ्याकडे आसाम पीसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून राज्यात काँग्रेसच्या उन्नतीसाठी मी खूप मेहनत घेतली. ज्यामध्ये काँग्रेसने पंचायत, पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान दिले होते. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत यामुळेच राज्यात काँग्रेसची सत्ता येईल असे लोकांना वाटू लागले होते, मात्र अंतर्गत भांडणामुळे काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावला, त्यामुळे जनतेने आम्हाला सत्ता स्थापनेचा जनादेश दिला नाही.