कोल्हापुरातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत चंद्रकांत पाटील राजीनामा देणार ?

 कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree jadhav) yयांनी भाजपचे सत्यजित कदम (Satyjeet kadam)  यांचा 18,901 मतांनी पराभव केला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपकडून मात्र सत्यजित कदम यांना चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पोटनिवडणुकीत एकूण १५ उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, मुख्य लढत मात्र जयश्री जाधव आणि सत्यजित कदम यांच्यातच झाली आहे. सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील या दोघांनी ही पोटनिवडणूक वैयक्तिक दृष्ट्या प्रतिष्ठेचा विषय केला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंनी दिग्गजांना प्रचारात उतरविण्यात आले होते. महाआघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले यांनी किल्ला लढवला, तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या.

दरम्यान, आता पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. गोव्यात अशक्यप्राय वाटणारा विजय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेचून आणला मग पाटलांना होमग्राउंडवर विजय का मिळवता आला नाही असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पाटील राजीनामा देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.