केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे निधन, कँसर झालेला असतानाही राजकारणात केलंय काम

Oommen Chandy Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी (Oommen Chandy) यांचे मंगळवारी (18 जुलै) निधन झाले. चंडी 2019 पासून कर्करोगाने ग्रस्त होते. मात्र, कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही ते उपचारासोबतच राजकारणात सक्रिय राहिले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही चंडी सहभागी झाले होते. चंडी यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मरियम्मा आणि तीन मुले आहेत.

केरळच्या राजकारणात ओमन चंडी हे मोठे नाव आहे. ते दोन वेळा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले होते. चंडी हे 2004 ते 2006 पर्यंत पहिल्यांदा मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर त्यांनी 2011 मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. ओमन चंडी 1970 ते 2023 या काळात केरळमधील पुथुपल्ली येथून निवडून येऊन विधानसभेत पोहोचले. 53 वर्षांची राजकीय कारकीर्द असूनही ओमन चंडी यांच्या नावावर ना घर होते ना कार.

2021 मध्ये ओमन चंडी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सुमारे साडेचार कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती होती. चंडी यांनी सांगितले होते की, त्यांचे त्रिवेंद्रममध्ये एक घर आहे जे त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. त्याचबरोबर स्विफ्ट कारही त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे.