गजानन कीर्तिकरांनी साथ सोडली पण मुलगा अमोल कीर्तिकर मात्र ठाकरेंसोबतच!

मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले तसेच भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या.

ह्या कार्यक्रमात खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर , रामदास कदम आणि मोठे संख्येने बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते.

दरम्यान, गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) जरी बाळासाहेबांची शिवसेना (SHinde Group) या पक्षात गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटात उपनेते या पदावर आहेत. गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी म्हटलं की, हा माझ्या वडिलांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी मात्र शेवटपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच राहील, असे अमोल कीर्तिकर यांनी सांगितले आहे.