भारतातली पोरं गणेशोत्सव-जयंती साजरी करण्यात व्यस्त, तरुणांची श्रमशक्ती वाया जाते- सूरज एंगडे

Ganeshotsav: भारतात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना आंबेडकरी चळवळीतील युवा अभ्यासक डॉ. सूरज एंगडे (Suraj Yengde) यांनी तरुणांना एक सल्ला दिला आहे. तरुणांनी गणेशोत्सव किंवा जयंती साजरा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा देशकार्य करावे, असे एंगडे यांनी म्हटले आहे. डॉ. एंगडे यांनी लिहिलेल्या ‘कास्ट मॅटर्स’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. या निमित्ताने मेहता पब्लिशिंग हाउसच्या ग्रंथदालनात ‘थेट भेट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. एंगडे यांनी उपस्थित तरुणांशी संवाद साधला.

‘जगभरात कम्युनिस्ट सत्ता असलेल्या देशांमध्ये १८, १९ वयाचे तरुण देशकार्यासाठी काम करतात; पण भारतातले तरुण याच वयात उत्सव, जयंती साजरे करीत बसतात. याचा विचार तरुणांनीच करायला हवा, सण उत्सवाच्या काळात तरुणांची श्रमशक्ती वाया जाते. राज्यातील तरुणांनी एक दिवस गणेशोत्सव साजरा करून नऊ दिवस सरकार पोहचले नाही, अशा ठिकाणी जाऊन रस्ते, पूल, शाळा, दवाखाने उभारणे आणि या पायाभूत सार्वजनिक सोयी सक्षम करण्याचे काम करावे. गणेशभक्तांनी हे गणेशाच्या नावानेच करावे. पण, विधायक कामे केली पाहिजेत’, असे डॉ. एंगडे तरुणांना उद्देशून म्हणाले.

‘कोणत्याही विचारांशी संबंधित चळवळ जिवंत ठेवायची असेल, तर तरुणांना त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा लागेल. किनाऱ्यावर बसून दुसऱ्याला नाव चालवण्याची सूचना देणारे मूर्ख असतात. चळवळीचेही तसेच आहे. बाहेर राहून केवळ चर्चा करून चळवळ सक्षम होणार नाही. त्यात तरुणांना उतरावे लागेल. कॉर्पोरेटपासून कोणत्याही क्षेत्रातील जातीयवाद संपवण्यासाठी बहुजनांना उच्चपदापर्यंत पोहोचावे लागेल. त्यासाठी बुद्धिमत्तेच्या जोरावर काम करून आपले स्थान तरुणांनी निर्माण करावे,’ अशी सूचनाही एंगडे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण