“आपला देश व्यक्तीच्या भक्तीत…”, गौतम गंभीर आडून आडून विराटवर घसरलाच

भारतीय संघ (Team India) हा जगातील क्रमांक एकचा क्रिकेट संघ मानला जातो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जागतिक क्रिकेटवर राज्य करत आहे. क्रिकेटचा अर्थ भारत मानला जातो. मात्र 2013 पासून टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 4 वेळा विजेतेपदापर्यंत पोहोचूनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला हे दुर्दैवी आहे.

भारताने 2013 पासून आयसीसीची कोणतीच ट्रॉफी जिंकलेली नाही. नुकत्याच झालेल्या WTC Final मध्ये भारताला हा दशकभराचा दुष्काळ संपवण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला अन् भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने भारतीय संघासह बोर्डावरही टीका केली आहे.

गंभीरने भारतीय संघाला नाही भारतातील फॅन कल्चरला याला जबाबदार धरलं. गंभीरने न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आपला देश हा संघासाठी वेडा नाही तर व्यक्तीसाठी वेडा आहे. आपण आपल्या संघापेक्षा एका व्यक्तीला जास्त मोठं मानतो. मात्र इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या देशात संघ हा एका व्यक्तीपेक्षा जास्त मोठा असतो.’

बीसीसीआयवर हल्लाबोल करताना गंभीर म्हणाला, ‘भारतीय क्रिकेट बोर्डाचे भागधारकही पीआरसारखे वागतात. ब्रॉडकास्टर घ्या. जर 3 खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असेल तर ते त्याचे कौतुक करत राहतील. त्यामुळे हा सामना त्यांच्यामुळेच जिंकला, असे लोकांना वाटत असले तरी हा सांघिक खेळ आहे.’