“मला तुमचा अभिमान वाटतो”, बोट सुजलेलं असतानाही देशासाठी खेळला अजिंक्य रहाणे; पत्नीने तोंडभरुन केलं कौतुक

भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यातील प्रदर्शन अत्यंत सरासरी राहिले. परिणामी त्यांनी २०९ धावांच्या फरकाने हा महत्त्वाचा सामना गमावला आणि दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. असे असले तरीही भारतीय संघाकडून दोन्ही डावात फलंदाज अजिंक्य रहाणे याने कौतुकास्पद कामगिरी गेली. आता या सामन्यानंतर रहाणेची पत्नी राधिका धोपवकर हिने भावूक पोस्ट करत तिच्या पतीवर अभिमान व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) फायनलमध्ये फलंदाजी करताना भारताचा अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला पहिल्या डावात बोटाला दुखापत झाली होती. रहाणेने बोटाला झालेल्या दुखापतीनंतर स्कॅन करण्यास नकार दिल्याचा खुलासा त्याची पत्नी राधिकाने केला आहे.

खेळाच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना पॅट कमिन्सच्या बाऊन्सरने रहाणेच्या उजव्या हाताच्या तर्जनीला मार लागला, त्याला लगेच वेदना जाणवू लागल्याने दुखापतग्रस्त बोटावर उपचार करण्यासाठी फिजिओ ताबडतोब मैदानात दाखल झाले. याच बोटाला रहाणेला यापूर्वीही मार लागला होता, ज्यामध्ये त्याचे बोट फ्रॅक्टर झाले होते. मात्र या दुखापतीनंतरही रहाणे दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला होता.

यावर राधिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टमध्ये लिहिले, “तुमचे बोट सुजले असूनही, तुम्ही तुमच्या मानसिकतेचे रक्षण करण्यासाठी स्कॅन करण्यास नकार दिला आणि अविश्वसनीय निस्वार्थीपणा आणि दृढनिश्चय दाखवून फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. तुमच्या वचनबद्धतेने तुम्ही क्रीजवर तुमची जागा घेतली, ज्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. मला तुमच्या अतूट सांघिक भावनेचा गर्व वाटतो, माझा लवचिक जोडीदार, तुझ्यावर अविरत प्रेम करण्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो”, अशा शब्दांत राधिकाने अभिमान व्यक्त केला.